सध्या एका कामवाल्या काकूंचा १८०० रुपये हिशोबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच फिरतोय. बऱ्याच लोकांना हा व्हिडिओ मजेशीर वाटला. काहीजणांनी तर कामवाल्या काकूंच्या समर्थनार्थ सरकारने १८०० रुपयांची नोट बाजारात आणावी म्हणून प्रतिक्रियात्मक व्हिडिओ सुद्धा बनवले. खरतर माझ्याकडून तो व्हिडिओ संपूर्ण बघवला नाही. त्या काकू ज्या तळमळतेने त्यांची बाजू मांडत होत्या ते पाहून जीव कासावीस झाला. फेसबुक व्हाट्सअँप, ट्विटर आणि यु ट्युबवर हा व्हिडिओ मला सारखा सारखा दिसायचा पण मी त्याच्यावर like, comment आणि share करणे टाळलं.
याबद्दल ब्लॉग लिहिण्याचा विचार करत असतानाच माझा खास मित्र अमोलने whatsapp वर या व्हिडिओ संदर्भात एक लेख पाठवला. सुरुवातीला मी वाचणं टाळलं पण मग शीर्षक बघून वाचायला सुरुवात केली. माझं मन ज्या गोष्टीमुळे कासावीस होत होतं अगदी तीच गोष्ट सहजतेने तरीही परखड आणि थोडक्यात मांडली होती. मी त्या लेखाबद्दल उलट शोध (reverse search) केल्यावर पुण्याच्या विश्वजीत बिराजदार यांनी तो लेख लिहिल्याचं समजलं. त्यांच्या परवानगीने तो लेख खाली सादर करत आहे. लेख छोटा आहे पण लाख मोलाचा आहे!
विश्वजीत बिराजदार यांच्या लेखाची प्रत
आज एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. एक कामवाल्या काकू काही बॅचलर पोरांशी त्यांनी १८०० रुपये दिले नाहीत म्हणून भांडत आहेत आणि त्याच वेळी हे देखील सांगत आहेत की त्यांनी ५०० च्या ३ नोटा आणि वरून २०० ची एक आणि १०० ची एक एवढेच पैसे दिलेत. पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला तेव्हा हसायला आलं. पण नंतर एक विचार डोक्यात चमकून गेला. अडाणी बया, घरदार चालवण्यासाठी लोकांची धुणी भांडी करत जगते. तिच्या गणितात १८०० म्हणजे काहीतरी वेगळाच आकडा असणार.. त्यात ५०० किती २०० किती १०० किती हे तिला नसेल कळत. तिच्या हिशोबी महिन्याचे राशन, नवऱ्याची दारू, (जिवंत असला तर), घरभाडे आणि लोकांची देणी सारायला सक्षम असलेला आकडा म्हणजे १८०० रुपये असेल कदाचित. पाचशेच्या तीन आणि वरून तीनशे रूपडे तिच्या मनातल्या १८०० ला कमीच पडणार! तुम्ही मला तेवढे पैसे दिले, लबाड बोलणार नाही, पण आपली बोली १८०० ची ठरली होती म्हणून शप्पथ घेताना तिच्या आतड्यांना पडणारा पीळ आपल्याला दिसणार नाही. चूक कुणाचीही नाही.. ना त्या पोरांची, ना त्या बाईची.. तिचा अडाणीपणा तिच्या जगण्याची कशी थट्टा करतोय हे तिला ठाऊकच नाही! शेवटी अडाणी कोण हेच कळत नाही. १८०० रुपयांमध्ये किती नोटा बसतात हे न कळणारी ती? की तिच्या जगण्याच्या धडपडीची आकडेमोड नं समजलेले आपण..
मूळ लेख : India Diaries ब्लॉगचा दुवा
लेखक: विश्वजीत बिराजदार
Facebook | Twitter
Related English Keywords: 1800 rs marathi maid story, sad story, emotional marathi maid 2020